Sunday, December 18, 2016

सायकलिंग की जय हो ...

धुळे - नाशिक - धुळे -  शिरपूर - धुळे स्पर्धा पूर्ण केल्यानंतर
जळगाव शहरात गेल्या सहा महिन्यांत आरोग्यासाठी धावण्याचे कल्चर तयार झाले आहे. जळगाव रनर्स गृपमध्ये आज अखेर १६० ते १७० जणांचा सहभाग आहे. धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये जळगावकर आता सहकुटुंब सहभागी होत आहेत. धावणे किंवा पोहणे हा आरोग्यासाठी शारिरीक उत्तम व्यायाम आहे, त्याचवेळी मी असेही म्हणून शकेन की, धावण्याप्रमाणेच सायकलिंग हा ही सर्वोत्तम व्यायाम आहे. दोन्ही प्रकारच्या व्यायामात शरिरीची आवश्यक ती हालचाल नक्की होते मात्र, सायकलिंगमुळे स्नायुंचे चापल्य आणि लवचिकता निश्चित वाढते. शिवाय, स्टॅमिना म्हणजे ज्याला आपण दम (दीर्घ श्वसन क्रिया) म्हणतो, ती सायकलिंगमुळे अधिक वाढते.  
धावण्यासोबतच मी सायकलिंगच्या प्रेमात पडलो आहे. आज (दि. १८ डिसेंबर २०१६ ला) धुळे नाशिक परत धुळे अशी ३०० आणि धुळे ते शिरपूर परत धुळे अशी १०० म्हणजे एकत्र ४०० किलोमीटर अंतराची सायकलिंग स्पर्धा पूर्ण केली. एवढेच नव्हे तर तीत दुसरा क्रमांकही मिळविला. हा आनंद सर्वांना शेअर करण्यासाठी मी हा विशेष ब्लॉग लिहतोय. हे अंतर मी आज २४ तास ४० मिनिटे वेळ नोंदवत पूर्ण केले. या स्पर्धेसाठी नियोजित अंतराला जास्तीत जास्त वेळ २७ तासांचा अपेक्षित होता. त्यातुलनेत मी कमी वेळ नोंदवला याचे समाधान आहे. म्हणूनच सायकलिंग विषयीची रंजक माहिती देताना मला अधिक आनंद होत आहे. माझ्या सोबत माझे मित्र व मार्गदर्शक स्वप्निल मराठे यांनीही २६ तासांची वेळ नोंदवत ही स्पर्धा पूर्ण केली.

सायकलिंग करण्याकडेही मी तसा अनावधानाने वळलो. नियमित धावण्यासह कधी तरी सायकल पळवायचो. मात्र, दि. ३ ऑक्टोबर २०१६ पासून मी हळूहळू सायकलिंगचा सराव वाढवला. नंतर सायकलिंगच्या प्रेमात पडलो. धावण्यापेक्षा सायकल पळविणे हा तसा सोपा व्यायाम आहे. पण, त्याद्वारे शरिराला मिळणारा व्यायाम हा धावण्यापेक्षा अधिक परिपूर्ण आहे.

स्वप्निल मराठे यांच्या सोबत सराव
जळगावमध्ये सायकलिंग करणारी मंडळी बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत. त्यात ऍड. आनंद परांजपे हे ज्येष्ठ सायकलिस्ट आहेत. तीन वर्षांपासून ते सायकलिंगचा सराव करीत आहेत. मी त्यांच्या संपर्कात आलो. त्यांनी सायकलिंगच्या बेसिक गोष्टी समजावल्या. त्याप्रमाणे मी सायकल पळवू लागलो. इतरही काही मंडळी माहित झाल्या. पण त्यांचा नियमित सराव नाही. ते कधीतरी सराव करतात. स्पप्निल मराठे हेही सायकलिंगचा नियमित सराव करतात. सध्या तरी हे दोघेच जळगावातील सायकलिस्ट आहेत. ऍड. परांजपे व मराठे हे यापूर्वी १५०, २०० किंवा ३०० किलोमीटर अंतराच्या सायकलिंग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दोघांच्या प्रोत्साहनामुळे मी सायकलिंगचा सराव वाढवत नेला. शिरसोली, वावडदा रस्ता हे आमच्या सरावाचे रस्ते आहेत. तेथेच पहिला सराव सुरू केला. दि. ६ ऑक्टोबर २०१६ ला जळगाव ते वावडदा हे ३६ किलोमीटर अंतर, दि. २० ऑक्टोबर २०१६ ला जळगाव ते पाथरी हे ५० किलोटरचे अंतर  पूर्ण केले. ५० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचा स्टॅमिना प्राप्त झाल्यानंतर मी दुप्पट अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला. अर्थात, त्यासाठी परांजपे व मराठे यांची साथ सोबत होती.
सायकलिंगची १०० किलोमीटरची पहिली फेरी दि. २२ ऑक्टोबर २०१६ ला जळगाव ते अजिंठा पूर्ण केली. हा सराव माझा उत्साह वाढविण्याठी उपयुक्त ठरला. त्यानंतर सराव व स्टॅमिना वाढवत नेला. दि. ६ नोव्हेंबर २०१६ ला मराठे यांच्यासोबत जळगाव ते सिल्लोड असा १५१ किलोमीटर अंतराचा सायकलिंगचा सराव केला.

दि. ७ डिसेंबर २०१६ ला परांजपे यांच्या सोबत जळगाव ते नेरी हे १०० किलोमीटर अंतर पूर्ण केले. नंतर दोघांच्या सोबत मी दि. ११ डिसेंबर २०१६ ला जळगाव ते अजिंठा व्हूयू पॉइंट हे १४१ किलोमीटर अंतर पूर्ण केले. परांजपे व मराठे हे अनुभवी असल्यामुळे ते सायकलिंग विषयी बारकावे सांगून सराव करुन घेत.
                  
जळगाव ते अजिंठा दरम्यान १०० किलोमीटरचा सराव करताना आमच्या तिघांच्या सोबत जळगाव रनर्स गृपचे सदस्य किरण बच्छाव, गुरूप्रसाद तोतला, विक्रांत सराफ, अविनाश काबरा हेही सहभागी झाले. या मित्रांच्या प्रोत्साहनामुळे मी धुळे नाशिक धुळे शिरपूर धुळे अशा ४०० किलोमीटर स्पर्धेत सहभागाचा निर्णय घेतला. त्यामुळे नियमित सराव करण्याची जबाबदारी येवून पडली.

धावण्याच्या स्पर्धेत जशी ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन व २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन असते, तशीच सायकलिंग स्पर्धा ही १५०, २००, ३००, ४००, ६०० व १,००० किलोमीटरची असते. या स्पर्धा अवूडेक्स इंडियातर्फे आयोजित होतात. एवूडेक्स धुळे तर्फेही दरवर्षी ४०० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा घेतली जाते.

धुळ्यात सायकलिंगचे कल्चर तयार झाले आहे. तेथील युवकांमध्ये सायकलिंगचे फॅड आहे. नाशिक येथे धुळ्यापेक्षाही अधिक सकारात्मक व उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या जळगाव शहरात रनर्स गृपचा धावण्याविषयीचा प्रयत्न वगळला तर धावणे व सायकलिंगचे कल्चर तयार करायला व वाढवाला संधी आहे. जळगावमध्ये धावण्यासह सायकलिंगचा वसा म्हणूनच मी निश्चयाने उचलला आहे.

ऍड. आनंद परांजपे,  स्वप्निल मराठे सोबत सराव
काही महिन्यांपासून धावणे व सायकलिंगचा नियमित सराव मी करीत आहे. त्याद्वारे मला शारिरीक व्यायामासह मानसिक ताण तणाल सहन करण्याची शक्तीही प्राप्त होत आहे. सायकलिंगमुळे माणूस अधिक कठोर आणि कणखर बनतो. धावणे हा व्यायाम समुह प्रकारात येतो मात्र, सायकलिंग हे कधीकधी एकाकीपणा देते. एक दोन जण अपवादाने सोबत असतात. त्यामुळे सायकलिंग करणारा माणूस व्यक्तीगत पातळीवर स्वतःच स्वतःला घडवतो.


सायकलिंगचा एक अनोखा फायदा हाच की, त्याचा सराव करताना तुम्ही अनेक गावे, तेथील माणसे व तेथील संस्कृती जवळून अनुभवता. म्हणजेच तुम्हाला तो परिसर उत्तमपणे माहित होतो. वाहनाच्या प्रवासातून अशी संधी मिळत नाही. लांब अंतराचा कोणताही सराव यशस्वीपणे पूर्ण झाला की, माणसाला स्वतःविषयी नवा आत्मविश्वास मिळतो. तो स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. माझ्या धावण्याच्या व सायकलिंगच्या सरावासाठी मला कौटुंबिक पाठींबा खूप सकारात्मक व उत्साह वाढविणारा आहे. अर्धांगिनी तथा डॉ. सौ. ज्योती यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज धुळे - नाशिक - शिरपूर परत धुळे या स्पर्धेत सहभागी होवू शकलो व ती पूर्ण करु शकलो. आज हा आनंद आपल्या सर्वांशी शेअर करताना माझी एकच अपेक्षा आहे, चला जळगावात आपण सायकलिंगचेही कल्चर तयार करु या ...

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. BRAVO..BRAVO...
    Proud of Jalgaon Team... Proud Of You Sir
    CONGRATULATIONS Ravi Sir & SwapnilJi

    From,
    Samir R.
    M/s. Dhulia Cycle Co., Jalgaon
    +91 8237356159 || 0257 2238812

    ReplyDelete
  3. हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  4. i have just started cycling at Mohadi Road Jalgaon. I live Mahabal Jalgaon. I am also having friends in nashik cycling group and i got inspired from them.

    i repaired old cycle of one of my friend and started practising on it. I would like to visit you sir and want to start cycling with you.

    ReplyDelete