Thursday, July 21, 2016

अनेक आजारांचे मूळ मानसिक असंतुलन

माणसाचे आरोग्य हे त्याचे निरोगी शरीर आणि स्वस्थ, संतुलित मानसिक अवस्था यावर पूर्णतः अवलंबून असते. शरीर स्वस्थ ठेवण्याकडे माणसं लक्ष देतात परंतू, मनाची स्वस्थता, संतुलन आणि शांतता याकडे जाणिवपूर्क लक्ष दिले जात नाही. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांचे परिणाम हे मनावर होतात. त्यानुसार आनंद, दुःख, निराशा, हास्य, अपमान, संताप असा भावना मनांत आणि नंतर अवयवांच्या हालचालींवरून स्पष्ट होतात. आनंद असेल तर तो हसून, नाचून व्यक्त होतो. दुःख असेल तर डोळ्यांच अश्रू येतात. संताप असेल तर शरीर थरथरते अथवा अबोल होते. अवमान मनांतल्या मनांत गिळून ठेवला जातो. अशा भाव-भावनांमुळे मानसिक ताण-तणाव निर्माण होतो. हा ताण-तणाव शरीराच्या इतर अवयवांवरही प्रभाव टाकतो. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. त्यालाच आपण मानसिक अस्वस्थता म्हणतो.

नेहमी तणावात असलेले मन शरीरावर वेगवगेळ्या  प्रकारचे घात करते. हे आघातच माणसाच्या शरीरात विविध आजारांना निमंत्रण देते. अशा प्रकारचा निष्कर्ष विविध शास्त्रज्ञांनी संशोधनातून काढला आहे. मानसिक आजारांना मनोशारीरिक आजार किंवा मनोकायिक आजार असेही म्हणतात.

मानवी मन हे मेंदूचे स्वतंत्र कार्य आहे. जेव्हा मनावर चांगले-वाईट परिणाम होतात तेव्हा शरीरावर नियंत्रण करणाऱ्या मेंदूवर परिणाम संभवतो. मेंदूवरील ताण शरीरातल्या प्रत्येक पेशींवर आणि दैनंदिन कामकाजावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतो. मानसिक तणावाला आमंत्रण देणारी चिंता असते. चिंता ही मानवी गरजांशी संबंधित भौतिक सेवा, सुविधा, अर्थकारण आदींशी संबंधित असते. काही व्यक्ती या सतत चिंतेत असतात. त्यांचे मन नेहमी त्यात गुंतलेले  असते. त्यातून भय, निराशा, एकलकोंडपणा, अबोला निर्माण होतो. यालाच न्यूनगंड असेही म्हणतात.

चिंताग्रस्त किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थतेचे काही दुष्परिणाम थेट माणसाच्या शरीरीवर होतात.  अतिचिंतेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. स्वभाव चिडचिडा होतो. नीट झोप येत नाही. दिवसभर आळस असतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. झोप आली तर दुःस्वप्ने पडतात आणि भिती आणखी वाढते. माणूस सतत द्विधा मनःस्थितीत राहतो. काहीवेळा अशी व्यक्ती गुन्हेगारी प्रवृतीकडे वळते. कधीकधी आत्महत्या करण्याकडे वळते.

माणसाला जेव्हा खूप चिंता वाटते तेव्हा त्याचा रक्तदाब वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. अवयवांसाठी रक्तपुरवठा वाढतो. पचनसंथेत कमी रक्त पुरवठ्यामुळे बिघाड होतो. अंग थरथरणे, डोकेदुखणे, पोटदुखणे अशी लक्षणे दिसून येतात. सततच्या चिंतेमुळे हृदयविकार, ब्रेन हॅम्रेज, पचनसंस्थेत बिघाड अशा अनेक आजारांना निमंत्रित देतात. चिंता व भीती यामुळे निद्रानाश होतो. चिडचिड, डोकेदुखी, थरथरणे, एकाग्रतेचा अभाव, वाईट स्वप्न पडणे ही सुद्धा अतिचिंता व भीतीची लक्षणे असू शकतात. मानसिक आजारामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, पित्त, पोटाचे विकार, आतड्यांचे आजार आणि त्यांमुळे सतत उद्भवणाऱ्या पचनाच्या तक्रारी, संधिवात, सोरायसिस, काही त्वचेचे विकार, डोकेदुखी, थायरॉईड आणि इतर अंतःस्रावी ग्रंथींचे आजार बळावू शकतात. महिलांमध्ये मासिक धर्माशी संबंधित आजार बळावतात.

कधीकधी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे व्यक्ती जास्त किंवा खुप कमी जेवण करते. त्यामुळे कृश होणे किंवा अतिलठ्ठ होणे असे प्रकार होतात. अशा आजारांमुळे माणसाची सामाजिक प्रतिष्ठा खालावते. ही बाब लक्षात घेवून माणसाने मनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. त्याला जपायला हवे. अस्थिर, उदास, बेचैन न होता रोजच्या ताण-तणावाकडे वेगळ्या, तटस्थ भूमिकेतून बघायला हवे.

मानसिक स्वास्थावर होमिओपॅथी गुणकारी

अनेक प्रकारच्या मानसिक रोगांवर 'होमिओपॅथी' ने गुणकारी उपचार करता येतात. होमिओपॅथीत औषधांचा विचार वेगळ्या प्रकारे केला गेला आहे. मानसिक आजारांची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या रुग्णास वेळीच होमिओपॅथी डॉक्टरकडे नेल्यास मनाचे स्वास्थ पूर्ववत करताना शारिरीक स्वास्थाची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न होमिओपॅथीकडून केले जातात.

No comments:

Post a Comment