Tuesday, April 26, 2016

जनसेवेचा घेतला वसा



मित्राहो नमस्कार,


मी सुद्धा आजपासून आपल्याशी संवाद साधणार आहे. बहुधा आठवड्यातून एकदा नियमित चर्चा करुया. मी आरोग्यसेवेत गेली तेरा वर्षे काम करीत आहे. त्याला जोडूनच सामाजिक कार्याच्या अनेक संस्था-संघटनांवरही मी आहे. हा अनुभव लक्षात घेता आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्यातील अनुभव, नवे विचार, प्रवाह याविषयी चर्चा करणे, इतरांचे एकून घेणे, नवा विचार मांडणे असा या संवादाचा प्रवास असेल. म्हणूनच, मी त्याला हेल्थप्लस म्हणतो. माणसाचे आरोग्य निरोगी, सुदृढ राहावे म्हणून जे जे शक्य आहे ते ते सारे प्लस करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
संवादाचा  प्रवास सुरू करताना माझ्या विषयी काही खासगी बाबी मी आपणास सांगणार आहे. आपल्यातील संवाद अधिक विश्वासाचा व्हावा म्हणून हा माझ्याकडून प्रयत्न. मी जळगावचाच. टीपिकल मध्यमवर्गीय सिंधी फॅमिलीतला. आमचे तसे १४ जणांचे कुटूंब होते. त्यात वडिल कन्हैयालाल यांच्यासह आई, आम्ही दोन भाऊ व दोन बहिणी. मी सर्वांत लहान. माझे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी नगरपालिकेच्या सिंधी माध्यमाच्या शाळा क्रमांक २९ मध्ये झाले. त्यानंतर ८ वी ते १० वीचे शिक्षण संत हरदासराम हिंदी शाळेत झाले. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेचे शिक्षण जळगावच्या एम. जे. महाविद्यालयात झाले. विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला वैद्यकिय शिक्षणाची संधी चालून आली. १९९६ ते २००२ च्या दरम्यान मी अमरावती येथे पंडित जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स या महाविद्यालयात बीएचएमएस चे शिक्षण घेतले. या अभ्यासक्रमात पहिल्या चौघांत माझा क्रमांक होता. गुणवत्ता घेवूनच मी उत्तीर्ण झालो. असा मी डॉ. रवी हिरानी झालो.

येथे एक आठवण सांगतो, माझे माध्यमिक शिक्षण हिंदीत होते. पण मला इंग्रजी भाषेची आवड होती. तेव्हा प्रा. डॉ. तेजपाल चौधरीसरांकडे मी इंग्रजीच्या शिकवणीसाठी जावू लागलो. त्यांनी अवघ्या दोन महिन्यात माझ्याकडून तयारी करून घेतली. मी कॉन्व्हेंटमधील मुलांप्रमाणे सहज इंग्रजीत संभाषण करू लागलो. याचा फायदा मला वैद्यकिय शिक्षण घेताना झाला. इंग्रजी पक्के झाल्याचा फायदा आज मला माझ्या व्यवसायात व सामाजिक कार्यातही होत आहे.

सिंधी समाजात काय असते, मुले मोठी झाली, थोडीफार शिकली की व्यवसाय-व्यापारात लक्ष घालतात.  मुली सुद्धा शिक्षण घेवून लग्नानंतर घरकामात लागून जातात. मला मात्र पहिल्यापासून वैद्यकिय सेवेत यायचे होते. मी ठरवून ते क्षेत्र निवडले.

वैद्यकिय शिक्षणादरम्यान मला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे होमिओपॅथी तज्ञ डॉ. वकार ताझी आणि डॉ. श्रीरंग ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. अमरावतीत डॉ. मनोज सबनिस, डॉ. अरुण हरवाणी यांच्यासोबत काम केले. तेथील जिल्हा रुग्णालयात डॉ.  पाटणकर व खासगी क्षेत्रात काम करताना डॉ. अजय डफळे यांचेही मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २००२ ते २००३ दरम्यान जळगाव येथे डॉ. जसवंत पाटील यांच्याकडे क्लिनिकल प्रॅक्टीसचा अनुभव घेतला. याच बरोबर यवतमाळचे डॉ. विनायक राठोड यांनी होमिओपॅथीसाठी प्रोत्साहन दिले. 

मी माझा स्वतःचा वैद्यकिय व्यवसाय दि. ८ मे २००३ रोजी सुरू केला. जळगावात आजही होमिओपॅथीवर विश्वास असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत होमिओपॅथी डॉक्टरांची संख्या कमी आहे. मी जळगावात वैद्यकिय सेवा देण्याचा निर्णय याच हेतूने घेतला. मी ही सेवा देत असताना शिक्षणातील अनुभव आणि आधुनिक तंत्राचा वापर करायचे ठरविले होते. आजकाल होमिओपॅथीत विविध सॉफ्टवेअरचा वापर करून रुग्णांसाठी योग्य अशी औषध योजना करणे सोपे जाते. तसा वापर तेव्हा जळगावात फार कमी लोक करीत होते. मी याला जोडूनच मूत्ररोग आणि मूत्रखडा या आजारावरील विशेष उपाय योजनांचाही अभ्यासपूर्ण वापर सुरू केला.

या शिवाय दमा, अलर्जी, पाईल्स, पांढरे डाग, त्वचा रोग, पिंपल्स आणि कॅन्सरवरील उपचार यातही योग्य उपचारांची पद्धत सुरू केली. कॅन्सरवरील उपचारासाठी मला डॉ. पी. बॅनर्जी (कोलकाता) यांनी मार्गदर्शन केले होते. 

सध्या मी माझ्या अनुभवातून पांढरे डाग, कॅन्सर व मूतखडा यावर हमखास उपचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्याकडे या प्रकारातील रुग्णांची संख्या जास्त आहे. आता कॅन्सरच्या २२ रुग्णांवर मी उपचार करीत आहे. येथे एक बाब स्पष्ट करतो ती म्हणजे, कॅन्सर बरा करण्याचा दावा मी करीत नाही. पण मी दिलेल्या औषधामुळे कॅन्सर रुग्णाचा वेदनांचा त्रास खुप कमी होते आणि काही प्रमाणात आजारामुळे नुकसान झालेल्या गोष्टी सुधारू शकतात. ही गोष्ट मी माझ्याकडील पेशंट हिस्ट्री पाहून ठामपणे सांगू शकतो. यातील काही उदाहरणे अशी – गळ्याचा , गालाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, स्पाईन कॅन्सर, ओव्हेरी कॅन्सर, ब्लॅड कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर. खासगी वैद्यकिय सेवेसोबत मी चामुंडामाता होमिओपॅथी मेडीकल कॉलेजमध्ये लेक्चररशीप केली. फेब्रुवारी २०१२ पासून मी जिल्हा रुग्णालयात आयुष विभागात होमिओपॅथिक वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करीत आहे. सरकारी योजनांच्या माध्यमातून आम्ही आरोग्य विषयक जनजागृतीचे विविध शिबिर, रॅली, प्रचार-प्रसारासाठी पत्रके वाटप करीत आहोत.

माझ्या या प्रवासात माझी सहचरीणी डॉ. ज्योती  यासुद्धा हिरहिरीने सहभागी आहेत. त्यांनी सुद्धा बीएचएमएस पूर्ण केले आहे. लग्नानंतर त्यांनी होमिओपॅथीमधील एमडी पूर्ण केले आहे. ही माझ्या प्रवासाची शॉर्ट फिल्म आहे. यापुढील प्रवासात माझे सामाजिक कार्य आणि इतर वैद्यकिय सेवांचा प्रवास सांगणार आहे. तूर्त थांबतो. पुन्हा भेटू ...



फिलॉसॉफी ऑफ एच

जळगावमधील सिंधी कॉलनीत आमचे डॉ. हिरानी क्लिनीक आहे. त्याचा मुख्य सिम्बॉल इंग्रजीतील एच हे अक्षर आहे. त्यामागे आमचे निश्चित मानसशास्त्र आहे. एच हा शब्द हेल्थ, हिलिंग, हॅपीनेस, होमिओपॅथी, हॅनेमन आणि हिरानी याचे प्रतिनिधीत्व करतो. म्हणूनच त्याचा वापर आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या प्रचार-प्रसारात लोगो म्हणून करतो.

No comments:

Post a Comment